शुक्रवार, २५ मार्च, २०१६

" श्री बालाजी " तिरुमलाय !

// श्री स्वामी समर्थ //
   // बालाजी प्रसन्न //
       " तिरुमलाय "
तिरुपतीला पर्वतावर राहणाऱ्या " बालाजींच्या" इच्छेनुसार मी तीन आठवडे देवस्थानच्या पायथ्याशी कामा निमित्त राहिलो होतो. या ठिकाणी एका कंपनीमध्ये " शेवया " तयार करणारे महाकाय असे इटालियन मशिन होते.या मशिनची आणि आमच्या मशिनची रुजवात घालण्यासाठी मी तेथे गेलो होतो. तिरुपती येथिल प्रचंड उकाडा असलेले हवामान हे मशिनवरील शेवया तयार करणे या साठी अत्यंत उपयुक्त होते. बालाजींचे दर्शन घेण्यासाठी  मात्र पर्वतावर म्हणजेच तिरुमलाय या ठिकाणी जावे लागे.आमचे मशिन विकत घेणारे मालक आणि तेथिल इंजिनियर्स बरोबर अतिशय उत्तम संबंध तयार होत असत.याच मंडळींच्या मुळे त्या भागातील बारीकसारीक गोष्टींचे ज्ञान  मिळत असे .तेथिल इंजिनियर्स हे माझे अत्यंत प्रेमळ असे गाईड असत. त्या मुळे बारीक सारीक खाचाखोचा सुध्दा कळत. या काळात पाच सहा वेळा वेगवेगळ्या पध्दतीने "बालाजींचे "दर्शन झाले. पाप क्षालन नावाच्या ठिकाणी जाऊन त्या वेळे पर्यंत केलेली बरीचशी पापे धुवून  काढली.डोंगरावरच्या जंगलात जाऊन बिबटे , हरीणे वगैरे प्राण्याचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला.. प्रसादालयात लाडूंच्या राज्यात मुक्त संचार करता आला. भक्तांनी नवस फेडण्यासाठी कापलेले केस हे  मोठमोठया गच्च्यां वरती स्वच्छ करुन वाळायला ठेवलेले असत. उत्तम प्रतिचे विग बनविण्यासाठी त्यांचा होणारा लिलाव  किंवा ते घेण्यासाठी येणारे असंख्य व्यापारी भेटले . तिरुमलाय  हा डोंगर उतरताना बसच्या ड्रायव्हरना करावी लागत असलेली कसरत  किंवा मराठी , कानडी ,तेलगू,मल्याळम आणि हिंदी भाषा जाणणारे तेथील दुकानदार अनुभवता आले. .त्या काळी प्रत्येक नऊ आॕगस्टला हा डोंगर पायी चढणारी श्रीदेवी वगैरे नविन गोष्टींची माहिती मिळत असे.तेथिल स्थानिक मंडळींच्या मुळे हा डोंगर पायी चढायला योग्य वेळ आणि सोपी वाट कोणती यांचे मार्गदर्शन मिळत असे. रात्री श्रम परिहार म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या भातांचे प्रकार असत आणि त्या नंतर अत्यंत जिद्दिने काढलेली चिरंजीवी किंवा रजनीकांतच्या सिनेमाची तिकीटे अशा असंख्य आठवणी आहेत.सिनेमा मध्ये काम करणाऱ्या बहूतेक कलाकारांना घरचाच मेंबर मानायची सर्वमान्य पध्दत तेथे होती.रजनीकांत हा रजनी किंवा श्रीदेवी ला फक्त "श्री " वगैरे नामोल्लेख असे. तिरुपतीमधील या प्रेमळ अशा इंजिनियर्स रुपी वाटाड्यांच्या मुळे " श्री बालाजींचे " उत्तम दर्शन होत असे .असंख्य डोंगरांच्या खोबणीमध्ये बसलेले हे गाव किंवा रेणिगुंठा स्टेशन पासून भाविकांचे येणारे लोंढे , पूर्णपणे टक्कल केलेले असंख्य आनंदी स्त्री-पुरुष असे भक्तगण, कर्कश अशा आवाजाचे हाॕर्न वाजवत अत्यंत वेगाने गाड्या चालवणारे ड्रायव्हर  किंवा अतिशय उत्तम असलेली देवस्थान ची बससेवा वगैरे गोष्टी अनुभवता आल्या 
कामाच्या निमित्ताने मोजक्याच काळासाठी सहवास लाभलेल्या त्या स्थानिक मंडळींची आणि तिरुमलाय येथे अधिष्ठान ठेवलेल्या डोंगरीच्या देवाची म्हणजेच " बालाजींची " सुखद अशी आठवण !
      विनायक जोशी (vp)
         २३ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा