मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

चैतन्यमुर्ती हरिभाऊ भावे काका

 // श्री स्वामी समर्थ  //

     *चैतन्य मुर्ती*

     *हरिभाऊ भावे काका*


विनायक जोशी (vP)

💬9423005702 

📱9834660237 



साधारणपणे १९८४ मध्ये वयाची साठी गाठलेल्या या तरुणाची आणि माझी पहिली भेट झाली.


लष्करातील आणि रेल्वे मधील नोकरी मुळे शेकडो अनुभवांचा खजिना त्यांच्या कडे होता .वयाच्या ५२ व्या वर्षी दोन हार्ट अॕटॕक पाठोपाठ येऊन सुध्दा केवळ अत्यंत आनंदी स्वभाव , निरपेक्ष वृत्ती , स्वाभिमानी बाणा यामुळे वयाच्या ९२व्या वर्षापर्यंत त्यांना प्रकृती किंवा परिस्थिती बद्दल कुरकुरताना कधीही बघितले नाही. 


सर्व आहार विहारात कमालीची शिस्त ते पाळत . एकमेकांच्या पासून कितीही लांब किंवा दूर अंतरावर असलो तरी आनंदी माणसांच्या मध्ये  काहीही न बोलता  विचारांची देवाणघेवाण होऊ शकते याची प्रचीती यांच्यामुळेच आली. ज्या ठिकाणी जातील तेथे आनंदाच्या असंख्य लाटांची निर्मिती ते सहजतेने  करत असत. 


शेवटच्या काळात त्यांनी जोडीदार गेल्याचे दुःख कसोशीने लपवून ठेवले होते. सोलापूर मधील वैशंपायनांच्या सहवासात अध्यात्माचे गिरवलेले धडे यावेळी त्यांना कमालीचे उपयोगी पडले.


  महिन्यातून कमीतकमी एकदा  दुपारच्या वेळी अचानकपणे मी त्यांना भेटायला म्हणून  जायचो . ते एकटे असायचे .भरपूर मोकळ्या गप्पा मारायचो . प्रचंड हसायचो .छान पैकी पाठ चेपून द्यायचो .त्यांची नजर अंधूक झाली होती तरी फक्त आवाज ओळखून आलेल्या माणसांशी ते आनंदाने बोलत असत. 


२०१५ सालच्या  जानेवारीत राव हाॕस्पिटल या दवाखान्यात त्यांना भेटायला गेलो . त्या वेळी त्यांना न्युमोनिया झालेला होता. एका isolated room मध्ये त्यांना ठेवले होते. आता परतीचा रस्ता नव्हता .

मरणाला अजिबात न घाबरता ते स्थितप्रज्ञा सारखे सामोरे गेले.दवाखान्यातून स्वतःहून डिसचार्ज घेऊन घरी आले आणि शांतपणाने २५ जानेवारी २०१५ या दिवशी पत्नीला भेटायला स्वर्गाकडे निघून गेले.


 ३२ वर्षांच्या आमच्या मैत्री मध्ये कोणत्याही गोष्टी साठी कधीही उदासवाणे बसलेले मी त्यांना बघितले नाही.

 काळानुरुप स्वतःमध्ये बदल करुन कायम आनंदी राहिलेल्या आणि आमची आयुष्ये मनाच्या श्रीमंतीने समृद्ध करणाऱ्या या ९२ वर्षाच्या  जगन्मित्राची म्हणजे हरिभाऊ भावे या आनंदी माणसाची छोटीशी  आठवण .......!!


(Google weather मध्ये आकाश निरभ्र असे दाखवत असतानाच अचानक आठवणींचे ढग जमा होतात आणि कोसळून मोकळे होतात.....गुगलला नकळत)


*विनायक जोशी (vp)*

💬9423005702 

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा