// श्री स्वामी समर्थ //
*पु .ल .देशपांडे नावाचा संस्कार*
विनायक जोशी (vp)
📱9423005702
सोलापूर मध्ये आमच्या घरात जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या समोर पदमाकर काकाने " वाऱ्यावरची वरात " हा पु.लं .चा एकपात्री कार्यक्रम सादर केला आणि माझ्या वरती पहिला आनंददायी आणि विलक्षण असा "पु.ल." नावाचा संस्कार झाला. पुढील आयुष्यात त्यांनी लिहिलेली ओळन् ओळ आम्ही " सखाराम गटणे " स्टाईल ने वाचून काढली.
नोकरी मध्ये असताना कोलकाता येथे जाण्याचा योग आला त्या वेळी पुलंच्या लेखातून भेटलेले शांतिनिकेतन किंवा तेथील रविंन्द्रनाथ टागोर,शर्वरीबाबू ,गौरीशंकर घोष ,रामकिंकरदा वगैरे जग प्रसिद्ध व्यक्तींचे कोलकाता नजरेसमोर होते.
लेह-लडाख चा विषय निघाला की १९६२ साली लडाख मधील वातावरणात लढणारे आपले सैनिक , त्या काळातील असुविधा ,सरकारी कारभार किंवा ग.दि.माडगूळकरांना त्या भूमीवरती स्फुरलेले शौर्य गीत या सर्वांचा उल्लेख असलेला "शूरा मी वंदिले "हा लेख आठवतो.
असामान्य प्रतिभाशक्ती लाभलेल्या या माणसाने स्वाभिमानी आयुष्याबरोबरच,
संगीत, चित्रकला, शिल्पकला, नाटक,
सिनेमा ,भाषाशास्त्र , कविता वाचन या गोष्टींच्याकडे बघायचा वेगळा निकोप दृष्टिकोन दिला.
मुंबई वरुन येताना "मेणाच्या पुतळ्यांच्या" प्रदर्शनाची जाहिरात लोणावळ्या जवळ वाचली आणि
पु.लं.नी उल्लेख केलेल्या "रघुनाथराव फडके " या महान कलाकाराने बनविलेले यांत्रिक मेणाचे पुतळे समोर दिसू लागले.
पु.लं.नी बऱ्याच देशात मोकळेपणानं भटकंती केली आणि अत्यंत सहजतेने आपले सर्व अनुभव लिहून ठेवले . निसर्गाची किंवा तेथील सौंदर्य यांची सहज जपणूक करणाऱ्या परदेशी लोकांच्या बद्दल अतिशय उत्तम आठवणी त्यांनी प्रवास वर्णनात लिहिल्या आहेत.
"नंदा प्रधान , रावसाहेब , नारायण , अंतू बर्वा , चितळे मास्तर , गौरीशंकर घोष ,शर्वरीबाबू , वसंतराव देशपांडे" ...वगैरे असंख्य मंडळींच्या बद्दल हृदयस्पर्शी लेखन त्यांनी केले आहे.
आपल्या सहवासात येणाऱ्या माणसांच्या मधील चांगले तेच सहजपणे शोधायचे किंवा राजकारण , भ्रष्टाचार , अंधश्रध्दा या विषयांच्या पासून दूर रहायचे , जरुरीपेक्षा जास्त संचय न करता समाजाला परत करायचे अशा प्रकारचे खोल संस्कार पु.लं.च्या मुळेच झाले .
बिंदू माधव जोशी यांनी ठरविलेल्या "क्रांतीचे गोंधळी" या कार्यक्रमात अटलबिहारी बाजपेयींच्या समोर महाप्रतिभावान अशा" स्वातंत्र्यवीर सावरकरां "बद्दलचे पु.लं.चे भाषण
यु ट्यूब वरती बघितले आणि कृतार्तथेने त्रिवार दंडवत घातले !!!
*८ नोव्हेंबर २०२०*
*विनायक जोशी (vp)*
📱9423005702
१२५७ , मंगलधाम , बी ३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा