रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

मिंग्लिश माझे इंग्लिशा

 // श्री स्वामी समर्थ  //

     *मिंग्लीश*

     "  माझे इंग्लिश "


     28/08/2020


       *विनायक जोशी (vp)*

💬9423005702  


 शिक्षण प्रसारक मंडळींच्या शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हा विषय शिकण्याची सुरुवात पाचवी मध्ये झाली.


 माझी आई त्या काळातील मॕट्रीक झालेली होती आणि वडील बीए .दोघांचेही इंग्रजीचे ज्ञान उत्तम होते.घरामध्ये "रेन आणि मार्टीन"चे ग्रामरचे पुस्तक होते.त्यांच्या सोबतीला तर्खडकरांची तीन भागातील व्याकरण माला . 


आम्हाला शाळेमध्ये इयत्ता आठवी पासून सेमी इंग्लिश होते.या सर्व गोष्टी सहजतेने झाल्या .



अकरावी आणि बारावीला मात्र भाषेकडे लक्ष देण्यासाठी पूर्ण वेळ नसताना" हायर इंग्लिश "नावाचा अवघड प्रकार वाट्याला आला. या कालखंडात आम्ही स्वयंघोषित हूशार मंडळींना काॕलेजमध्ये भरपूर इंग्रजी पाजळून घेतली . आपल्या इंग्रजी ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी पन्नास साठ  इंग्रजी सिनेमे वगैरे बघितले. 


नोकरीच्या निमित्ताने  मात्र "नायक्रोम" नावाच्या विद्यापीठात प्रवेश केल्यावर " इंग्रजी " भाषेचा वापर नगण्य झाला. या ठिकाणी जर्मन तंत्रज्ञानाचा खूप  प्रभाव होता .  त्यामुळे इंग्रजीचा विसर पडला. फर्ग्युसन काॕलेज रोड वरती असलेल्या ब्रिटिश लायब्ररीत जाणे सुध्दा संपुष्टात आले. नोकरीची ही वीस वर्षे अत्यंत खोल अशी वैचारिक बैठक असलेल्या आणि अत्यंत हुशार अशा मराठी मंडळींच्या मध्ये  घालवली. 


 याच काळात बऱ्याच ऋषीतुल्य मंडळींच्या बरोबरीने काम करता आले. कोणत्याही संकल्पना समजून घेताना मराठी या मातृभाषेमुळे कमालीचा आनंद मिळाला .


  त्या मुळेच  " इंग्लिश " नावाच्या या विदेशी मावशी पासून म्हणजेच इंग्रजी पासून मात्र दूर राहीलो ....!   


आमच्या घरातील क्लास मध्ये कल्याणी मुलांना  " डॕफोडील्स " ही कविता उत्तम पणे शिकवतेच आणि त्या नंतर मात्र लगेचच त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेली परंतू आपलीशी वाटणारी अशी " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे "  ...! एका पाठोपाठ येणाऱ्या आनंदाच्या या "सरीं वर सरी "मुलांच्या चेहऱ्यावर दिसायला लागतात आणि सपक गोऱ्या अशा विदेशी मावशीच्या मागे  उभी असलेली अत्यंत तेजस्वी अशी "माय मराठी "दिसू लागते !!!


*विनायक जोशी ( vp )*

💬9423005702 

१२५७ , मंगलधाम , बी३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा