मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

स्वर्गिय मुन्नार

 // श्री स्वामी समर्थ //


    *स्वर्गीय मुन्नार*


       4/8/2020

          

       *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

 📱9834660237 



   केरळ मधील अतिशय सुंदर असे डोंगरावरचे गाव म्हणजेच *मुन्नार*.या गावाच्या  जवळचे चहाचे मळे टाटांनी विकत घेतले  होते. साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी आणि तेथील मूळ स्थानिक लोकांच्या मधील *कानन आणि देवन* या बंधूनी डोंगर उतारावर चहाची असंख्य झाडे अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने लावलेली होती.


टाटांनी हे मळे विकत घेतले त्यावेळी चहाची काही झाडे १०० वर्ष जुनी होती. मी ज्यावेळी "मुन्नार " मध्ये गेलो होतो त्यावेळी तेथे फक्त दोन हाॕटेल्स होती .ज्यांचा वापर टाटांच्या कडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी होत असे. गावामध्ये एक अत्यंत सुंंदर चर्च होते. त्या ठिकाणी धीरगंभीर अशा आवाजाची एक प्रचंड घंटा होती.दिवसभर ढगांचे पांढरे शुभ्र थवे एकामागून एक असे येऊन पूर्ण मुन्नारला भेट देऊन जात असत.


इंग्रजांच्या काळातील एकमेकांच्या पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर  दूर असे अनेक बंगले आणि त्यांच्या नोकर वर्गाची घरे  अशा प्रकारच्या अनेक  वस्त्या होत्या. चहाच्या मळ्यात पाने खुडणाऱ्या बायकांच्या पाठीवर पाने गोळा करण्यासाठी टोपल्या असत आणि हातात मार्कर स्टीक.चहाची पाने कोणत्या लेव्हल पर्यंत तोडायची याची अनुभव सिध्द पध्दत होती.


या चहाच्या मळ्यांच्या आसपास असंख्य उंच उंच अशा वृक्षांचे जंगल होते.या जंगलात पक्षांच्या पेक्षा हत्ती जास्त होते. या डोंगराच्या मधील दरीत पांढरी शुभ्र अशी "टाटा टी" ही चहाची फॕक्टरी होती.


या ठिकाणी खुडलेल्या पानांच्या पासून  वेगवेगळ्या दर्जाची चहाची पावडर तयार करायचे अनेक  विभाग होते.या येथेच भारतातील पहिले असे चहा पावडर पाॕलिथीन बॕगे मध्ये भरायचे मशिन होते.टाटांनी या क्षेत्रात पाॕलिथीन बॕग मधील चहा ही संकल्पना घेऊन प्रवेश केला होता. त्या पहिल्या वहिल्या मशीन साठी आम्ही तेथे गेलो होतो .


त्या वेळी पर्यटकांना उपयुक्त अशा कोणत्याही सुविधा मुन्नार मध्ये नव्हत्या.

"मल्याळम तरीयादे" एवढे एकच वाक्य पाठ करुन मी  भारतातील या अत्यंत निसर्ग संपन्न डोंगराळ भागात आमच्या मशिनसाठी गेलो होतो. येथील जंगल ,चहाचे मळे, ढगांची शाळा आणि अत्यंत शांत वातावरणात माझा  " Signal Processing " या विषयाचा प्रॕक्टीकल अभ्यास सुरु झाला.


 सलग पंचवीस दिवस मी येथे होतो. इलेक्ट्रॉनिक्स मधील आणि अॕटोमॕटीक पॕकेजिंग मशीन्स मधील *अतिशय मूलभूत प्रॕक्टीकल असे ज्ञान या गावात मिळाले* आणि हे  शिक्षण देणारा गुरु म्हणजे जर्मन बनावटीचा Automatic weigher होता. ज्याचे नाव होते *Automa* 


*विनायक जोशी (vp )*

💬9423005702

📱9834660237 

१२५७,मंगलधाम , बी३, हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१.

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा