गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

सायकल आणि सायकल !

// श्री स्वामी समर्थ //
       " सायकल "
आमच्या कडे रँलीज कंपनीची कँरीयर वगैरे असलेली उत्तम दणकट सायकल होती.मी ११ वी मधे वालचंद काँलेज सोलापूर येथे प्रवेश घेतला.वालचंद काँलेज हे आमच्या काँलनी पासून ३ किलोमीटर दूर असल्यामुळे या सायकलचा ताबा मला मिळाला.सायकल हे तीन माणसांनी अत्यंत आनंदाने चालवायचे वाहन आहे या गोष्टी वरती आम्हा मित्रांचा गाढ विश्वास असल्यामुळे पुढिल दोन  वर्षे आम्ही तिबल सीट काँलेजला जात असू.सायकलच्या नळीवर बसणाऱ्या कडे पुढिल १० फुट अंतरातील गर्दी हटवणे हे काम असे .या साठी ओरडणे किंवा अपशब्द वापरायची मुभा असे.यासाठी कानडी ही उत्तम भाषा आहे. सिटवर बसणारा उंच पाहीजे.सायकल थांबली असताना तिघांचा भार थोडा वेळ त्याला पेलावा लागे . कँरीयर वर बसणारा हा चढावरती पायडलींगला मदत करणारा आणि उतारावर चपला घासून सायकल चा वेग कमी करण्याची कला अवगत असणारा लागत असे. तिघां मधे उत्तम प्रकारचा समन्वय लागत असे.गर्दी असेल तर आरडाओरडा , रस्ता रिकामा असेल आणि ऊतार असेल तर किंचाळणे आणि सपाट रोड असेल तर किशोर कुमारचे 'झुमरु' या सिनेमा मधील याँडलिंग चालू असे. सायकल हे चरबी जाळून टाकण्यासाठी चे मशीन आहे वगैरे उदात्त विचारांपासून आम्ही शेकडो योजने दूर होतो. आमच्या काँलनी पासून वालचंद जवळच्या 'आम्रपाली 'हाँटेल पर्यंत अतिशय आनंदाने ने आण करणाऱ्या त्या सायकलची हि आठवण ....!
विनायक जोशी (vp)
20 November 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा