बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

केंकरे सर IIT Kharagpur !!

// श्री स्वामी समर्थ //
        "केंकरे सर"
   "IIT Kharagpur 1972 "
साधारणपणे सहा फूट उंची आणि त्याला अनुसरून व्यवस्थित तब्येत. माझ्या कल्पने प्रमाणे कंपनीतील पहिला IIT. त्या काळात  शेतकऱ्यांना दुधाच्या ॲटोमेटीक मशिनची आणि पिशव्यांची उपयुक्तता पटवून देतानाची एक व्हिडीयो कॕसेट कंपनीने काढली होती त्या मध्ये त्यांचे दर्शन पहिल्यांदा झाले. कोणीही पाहूणे आले की त्यांना नवीन कामांची माहिती देणे वगैरे कामे त्यांना करावी लागत. त्या  काळी 8085 हा प्रोसेसर नुकताच आला होता . तो वापरुन पॕकेजींग मशीनचे कंट्रोलर करायचे ठरले.  यावेळी त्यांच्या  हाताखाली माझी नेमणूक झाली. अप्पा बळवंत चौकातून मोठा फळा आणून आमचा क्लास चालू झाला. अर्थातच  या क्लास मध्ये  ७१ चे युध्द किंवा  त्या मुळे  खरगपुर IIT मध्ये  असलेले black out किंवा त्या काळातील तीन  मजली computation मशिन्स वगैरे विषयाचे सुध्दा ज्ञान घेणे चालू होते. आमच्या दोघांची वेव्हलेंग्थ जमायचे एक कारण म्हणजे अतिशय किरकोळ किंवा फालतू गोष्ट असेल तरीहि भरपूर हसणे. कोणत्याही गोष्टी बद्दल अतिशय खोल विचार करणे आणि उत्तम documentation . या विषयांची आवड त्यांच्याच मुळे वाढली . एखाद्या  LED कडे बघून साधारण मिली सेकंदां मध्ये  On time सांगणे, एखाद्या गोष्टीला हात लावून अंदाजे त्याचे Temperature सांगणे , कानाला ऐकू येणाऱ्या Solenoids च्या आवाजावरुन मशीनच्या तब्येती बद्दलचे आडाखे बांधणे  वगैरे गोष्टी त्यांच्या मुळेच शिकता आल्या . थोडक्यात माझ्या  आयुष्यात मशीन सुध्दा बोलतात या पर्वाची सुरवात त्याकाळात झाली . फ्लो चार्ट काढणे , हँड कोडींग करणे ,वेगवेगळ्या नाॕपची जागा ठेवणे  वगैरे कष्टदायक आणि कंटाळवाण्या गोष्टी ते चिकाटीने करत असत. अत्यंत आनंदाने गडगडाटी हसणाऱ्या आणि अत्यंत परफेक्ट काम करणाऱ्या या माणसा मुळे IIT खरगपुर ही दिलदार आणि उमद्या मंडळींची संस्था आहे असा कायमचा ठसा उमटला ! आजही बरीच आकडेमोड करुन एखाद्या कांपोनंटची अव्यवहार्य किंवा अवास्तव व्हॕल्यू येते त्या वेळी केंकरे सरांची आणि गडगडाटी हसण्याची आठवण येते !!!!
विनायक जोशी (vp )
24 february 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा