रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

" गुरुप्रसाद " सोलापूर !

// श्री स्वामी समर्थ //
            " गुरुप्रसाद "
सोलापूर मधील अतिशय सुंदर अशा काँलनी मधे आमचे घर आहे. घराच्या आवारात भालदार चोपदारा सारखे उभे असे दोन औदुंबर आहेत.त्यांना खेटून हिरवागार कडूनिंब आहे. औषधी करंजी आहे , लालबुंद बदाम आहे , अशोक आणि आंबा एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. प्रत्येक सोमवारी लागणारा बेल आहे.आवळा आणि शेवगा एकटेच ऊभे आहेत.सिताफळ आणि काटेरी वाघनखे असलेला गजगा आहे.तगरी ,जास्वंद ,अबोली आणि पारिजातक यांच्या वेगळ्या गप्पा चालू आहेत.दारात तुळशी वृंदावन आहे.सोनचाफा मात्र  स्थितप्रज्ञा सारखा पाहतो आहे. असंख्य पक्षांची घरटी आहे.भरपूर खारी आहेत .कावळे , साळूंक्या आणि पोपट आहेत.सतत रंग बदलणारे सरडे आहेत .रात्री मात्र सर्व पक्षी झोपले की वटवाघुळांचे राज्य चालू होते. औदुंबराच्या पारावर आईच्या असंख्य आठवणी आहेत . देवघरात वडीलांचे अस्तित्व आहे. घराच्या दरवाजात ऊभे राहून कायम कोणाची तरी काळजी करत वाट बघणाऱ्या आजीच्या आठवणी आहेत . संध्याकाळी ऊदबत्ती लावून भिमरुपी , रामरक्षा वगैरे मोठ्याने म्हणून घेतले. आज घराची कुलपे काढताना स्वागताला आपल्याच नादात असलेली शुभशकुनी अशी भारद्वाजाची तुकतुकीत जोडी दिसली आणि सोलापूला आल्याचे चीज झाले !
   विनायक जोशी ( vp)
5 December 2015

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा