बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

"चालणे एक व्यसन "

// श्री स्वामी समर्थ //
" चालणे एक व्यसन "
गेली १५ वर्षे हे व्यसन अतिशय आनंदाने सांभाळले आहे.या व्यसनाला कोणत्याही उद्दिष्टांचा लगाम लावलेला नाही.पुण्यात सहकारनगर पासून खडकवासला येथ पर्यत रस्ताच्या डावीकडे रहात असलेल्या मंडळींना अत्यंत जवळ असे असंख्य टेकडीवजा डोंगर स्वागताला ऊभे आहेत. या डोंगराळ भागात चढताना आपल्याला छाती आणि कंबर आणि उतरताना गुडघे आणि तळपाय हे अवयव आहेत याची प्रचिती येते.टेकडीवरती असंख्य झाडे प्रत्येक ऋतूत  वेगवेगळ्या प्रकारे आपले रंगरुप पालटून विस्मयचकित करतात. याच ठिकाणी भिडस्त अशा मोरांचे आवाज ऐकू येऊ लागतात. जिथे माणसांची वर्दळ नाही तेथे आनंदाने बागडताना दिसतात.मुंगुस मात्र आपल्याच नादात तुरुतुरु रस्ता पार करतात. माणसांनी मात्र पहाटेच्या अंधारात ओळख पटावी म्हणून "श्री हरी" ही आरोळी कोडवर्ड म्हणून फायनल केली आहे. साधारणपणे ७० वय पार केलेली मंडळी डोंगर चढताना क्रिकेट,राजकारण  वगैरे विषयांवर आक्रमक विचार प्रकट करत सहजपणे चढाई पूर्ण करतात. आधुनिक मोबाईल मधील Accupedo ही प्रणाली आपल्याला आपले दैनंदिन चालणे या विषयी बरीच माहिती दररोज देते.या मधे आपण कितीवेळ आणि किती पावले चाललो वगैरे माहिती देते. या मधील खर्च झालेल्या कँलरीज वगैरे गोष्टी मी कधीही वाचत नाही. आपण किती पावले चाललो हे मात्र नेहमीच बघतो .या मधे अतिशय मजेदार गोष्ट म्हणजे  एकाच रस्त्यावरून आपण येतजात असलो तरी घरी परततानाची पावले नेहमी कमी दिसतात . ही Algorithm ची कमाल आहे की घराची ओढ याचा विचार न करता मस्त चालायला लागायचे !
विनायक जोशी (vp)
3 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा